नवी दिल्ली. Kidney Failure Deaths : छिंदवाडा जिल्ह्यात किडनी निकामी झाल्यामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे सत्र अजूनही सुरूच आहे. गेल्या 30 दिवसांत ही संख्या नऊ झाली असल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नागपूरमध्ये उपचारादरम्यान आणखी एका मुलाचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या नऊ झाली आहे.
किडनी निकामी झाल्यामुळे 4 सप्टेंबर रोजी पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर एका महिन्यातच ही संख्या 9 वर पोहोचली. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
दररोज 120 मुलांची तपासणी -
परासियाचे एसडीएम सौरभ कुमार यादव यांनी सांगितले की, प्रशासनाने आतापर्यंत 1,400 मुलांची तपासणी केली आहे आणि दररोज तपासणी मोहीम सुरू आहे. सध्या, संभाव्य रुग्णांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांच्यावर लवकर उपचार करण्यासाठी दररोज 120 मुलांची तपासणी केली जात आहे.
सध्या, आरोग्य विभाग आणि प्रशासन या आजाराचे मूळ शोधण्यासाठी आणि बाधित मुलांना योग्य उपचार देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत, छिंदवाडा जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह म्हणाले की, मुलांच्या पालकांनी कोणते औषध दिले याची चौकशी सुरू आहे. जर एखाद्या बनावट व्यक्तीने औषध पुरवले असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सध्या, किडनीच्या संसर्गाचे कारण निश्चित करण्यासाठी पाण्याची देखील चाचणी केली जात आहे.