एजन्सी, नवी दिल्ली: गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील मोडासा शहराजवळ मंगळवारी पहाटे एका रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका नवजात बाळाचा, एका डॉक्टरचा आणि इतर दोघांचा जळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास आग

पोलीस निरीक्षक डीबी वाला यांनी सांगितले की, जन्मानंतर आजारी असलेल्या एका दिवसाच्या बाळाला मोडासाच्या रुग्णालयातून अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले जात असताना मोडासा-धनसुरा रोडवरील रुग्णवाहिकेत पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

चार जणांचा मृत्यू

त्यांनी सांगितले की, बाळ, त्याचे वडील जिग्नेश मोची (38), अहमदाबाद येथील डॉक्टर शांतीलाल रेंटिया (30) आणि अरवली येथील परिचारिका भूरीबेन मानत (23) यांचा मृत्यू झाला. मोचीचे दोन नातेवाईक, खाजगी रुग्णवाहिका चालक आणि इतर तिघे जण भाजले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसपी डीबी वाला म्हणाले, "जिग्नेश मोची हा शेजारच्या महिसागर जिल्ह्यातील रहिवासी होता आणि त्याच्या नवजात बाळावर जन्मानंतर मोडासातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेत असताना, वाटेत काही अज्ञात कारणामुळे रुग्णवाहिकेला आग लागली."