जेएनएन, जालना. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हेच त्यांच्या हत्येचा कट रचत आहेत. याप्रकरणी जालना पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा तपासाला लागली आहे.

धमक्यांमुळे वाढली चिंता-  

काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवघेण्या धमक्या आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यापूर्वीही जरांगे यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांनी थेट राज्यातील अजित पवार गटाचे नेत्याचे नाव घेतल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.

जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप-  

माझ्या जीवावर उठलेला कट कोणत्या पातळीवर रचला जात आहे हे आता स्पष्ट झाले आहे. मला मारण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत. याबाबत माझ्याकडे ठोस माहिती आहे आणि याबाबत मी पोलिसांना तक्रार दिली आहे. अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला थांबवण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी हा कट रचला जात आहे. मी मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांचा तपास सुरू -

    जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या तक्रारीची नोंद घेतली असून, प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या फोन कॉल्स, मेसेजेस आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गरज पडल्यास सायबर शाखेची मदत घेण्यात येईल.

    धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळले-

    दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले की, जरांगे पाटील यांचे आरोप राजकीय हेतूने केलेले असून त्यात कोणताही तथ्यांश नाही. माझा आणि त्यांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही. तपास यंत्रणांनी सत्य समोर आणावे.