जेएनएन, नवी दिल्ली. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. सिंह यांना मध्यप्रदेशमध्ये मामा म्हणून संबोधले जाते. रमी खेळणार कृषी मंत्री नकोत त्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही माविआच्या खासदारांनी केली आहे.
रोहित पवारांनी शेअर केला व्हिडिओ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोकाटे मोबाईलवर ‘रमी सर्कल’ हा गेम खेळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला असून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “ती फक्त जाहीरात होती, मला रमी खेळता येत नाही.” मात्र, विरोधकांनी या स्पष्टीकरणावर विश्वास न ठेवता सरकारवर जोरदार टीका सुरू ठेवली आहे
दरम्यान, महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा आणि शेतकरी विरोधी भूमिका घेणारा कृषीमंत्री राज्याला नको, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या भेटीला ‘मामा’ कनेक्शन म्हणूनही ओळखलं जात आहे आहे.
या भेटीबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे, “महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी केली.” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने… pic.twitter.com/kgOLnuvD4S
— Supriya Sule (@supriya_sule) July 22, 2025
हेही वाचा - Monsoon Session 2025: ईएसआयसी योजनेची वेतन पात्रता मर्यादा 35000 करा, धनंजय महाडिकांची संसदेत मागणी