पीटीआय, नवी दिल्ली. Kanhaiya Lal Murder Case: सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एनआयए (NIA) आणि उदयपूरचे शिंपी कन्हैया लाल यांच्या मुलाच्या याचिका फेटाळून लावल्या. कन्हैया लाल यांची 2022 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती.
न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने मोहम्मद जावेदला जामीन देण्याच्या राजस्थान हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालय राजस्थान हायकोर्टाने जावेदला जामीन देण्याच्या आदेशाविरोधात एनआयए आणि कन्हैया लाल यांचा मुलगा यश तेली यांच्या याचिकांवर सुनावणी करत होते.
यश तेली यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, "जावेदची भूमिका गंभीर आहे. त्याने हल्लेखोरांना सांगितले होते की कन्हैया त्यावेळी कुठे होता. राजस्थान हायकोर्टाने गुन्ह्याच्या गंभीरतेचा खोलवर विचार न करताच निर्णय दिला, जो योग्य नव्हता. ही हत्या देशभरात जातीय तणावाच्या वातावरणात करण्यात आली होती."
याचिकेत दावा करण्यात आला की, मुख्य आरोपींनी हत्येचा कट रचला, शस्त्रे गोळा केली, जागेची टेहळणी केली आणि ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी जावेदला कामाला लावले. घटनेच्या दिवशी, आरोपी ग्राहक म्हणून कन्हैया लालच्या दुकानात घुसले आणि त्याची हत्या केली.
तर, एनआयएने आपल्या युक्तिवादात म्हटले की, आरोपी जावेद कन्हैया लालच्या दुकानाच्या जवळच्या एका दुकानात काम करत होता आणि त्यानेच हल्लेखोरांना माहिती दिली होती.
या घटनेचा तपास एनआयए करत आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे, कन्हैया लाल यांची आरोपींनी 28 जून 2022 रोजी उदयपूरच्या हाथीपोल परिसरात त्यांच्या दुकानात हत्या केली होती.