फतेहपूर - फतहेपूरमध्ये दोन मजली घरात आग लागल्याने दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे दोन मजली घराचे छत कोसळले. यामध्ये एकाच कुटूंबातील पाच लोक दबले गेले. या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

मलवां कस्बा येथील फळ विक्रेते सुरेश गुप्ता यांच्या घरात सोमवारी सायंकाळी जेवण बनवत असताना घरगुती गॅस सिलिंडरमध्ये आग लागलीय सिलिंडरला आग लागल्याचे पाहून सुरेश यांची पत्नी पूजा देवी, मुलगी लक्ष्मी देवी व बहीण उमा देवी ओरडत घराबाहेर पडल्या.

त्यानंतर सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली व परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

आरडाओरडा व किंकाळ्या ऐकून शेजारी पाजारी व ग्रामस्थ घटनास्थळी धावले. लोकांनी ढिगारा हटवण्यास सुरूवात केली. ढिगारा अंगावर कोसळल्याने फळ विक्रेत्याचा 24 वर्षीय पुतण्या आलोक गुप्ता व आठ वर्षीय वेद गुप्ता यांचा मृत्यू झाला.

तर 15 वर्षीय अर्पित गुप्ता, 18 वर्षीय रोहित गुप्ता व शेजारचा पाच वर्षीय गुड्डन आगीत गंभीररित्या भाजले. त्यांना रुग्णवाहिकेतून मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.