मुंबई. Packaged Drinking Water: देशातील पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि मिनरल वॉटरच्या गुणवत्तेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशव्यापी देखरेख मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या बाटल्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे. पाण्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन केले जात आहे की नाही, याची पडताळणी करण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे.

FSSAIने या संदर्भात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या उत्पादन आणि विक्रीवर देखरेख वाढवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंपन्यांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बिस्लेरी प्रकरणानंतर तपासणीला वेग

या देशव्यापी मोहिमेला बिस्लेरी इंटरनॅशनलच्या गोवा येथील उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीची पार्श्वभूमी आहे. या नमुन्यात सुरुवातीला निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळल्याचे FSSAIने स्पष्ट केले होते. त्यानंतर कंपनीने केलेल्या अपिलानुसार नमुना संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. तेथेही पाण्यात पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याने नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला. या प्रकरणात बिस्लेरी इंटरनॅशनलविरोधात खटला चालवण्यास FSSAIने मंजुरी दिली आहे.

मात्र, या कारवाईचा संबंध कंपनीच्या एका विशिष्ट बॅचच्या नमुन्याशी आहे. त्यामुळे संपूर्ण कंपनीची उत्पादने किंवा बाजारातील सर्व पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्या असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. बिस्लेरी कंपनीनेही आपले पॅकेज्ड पाणी सुरक्षित असल्याचा दावा करत नियामक यंत्रणेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यांना तपासणी आणि नमुने संकलित करण्याचे आदेश

    FSSAIने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना पत्र पाठवून तपासणीची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. त्यानुसार संबंधित विभागांनी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांच्या कारखान्यांची नियमित तपासणी करावी. तसेच जोखीम आधारित पद्धतीने पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.