नवी दिल्ली. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या  राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनामुळे राजधानी दिल्ली पोलीस छावणीत बदलली आहे. पोलिसांनी जंतरमंतर परिसराची पूर्ण नाकेबंदी करत आंदोलकांना तेथे जाण्यापासून रोखले आहे. मात्र सीजेपी कार्यकर्त्यांनी दिल्लीत जागोजागी गनिमी काव्याने आंदोलन सुरू केले आहे. जंतरमंतरवर जाणे अशक्य झाल्याचे दिसताच सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी कनॉट प्लेस, मिंटो ब्रिज आणि आसपासच्या प्रमुख चौकांमध्ये एकत्र येत घोषणाबाजी केली. यामुळे आंदोलन पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांची मोठी धावपळ उडाली असून सकाळपासून शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) निषेध आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. शीर्ष नेतृत्वाच्या अनुपस्थितीत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी सीजेपीचे संस्थापक दिपके यांनी अजिंक्य शिंदे यांच्याकडे आंदोलनाची सूत्रे सोपवली आहेत.

दिपके यांनी CJP च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, "जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ मला, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या अनुपस्थितीत अजिंक्यच निषेध आंदोलन आणि CJP आंदोलनाचे नेतृत्व करतील. कृपया त्यांना पाठिंबा द्या."

कधीपर्यंत करणार सीजेपीच्या आंदोलनाचे नेतृत्व?

ही जबाबदारी त्यांना तोपर्यंत पार पाडायची आहे जोपर्यंत अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका होत नाही. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया की अजिंक्य शिंदे कोण आहेत, जे जंतर-मंतरवर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व करतील.

जिथे थांबवतील तिथेच आंदोलन सुरू करा- शिंदे

    अजिंक्य शिंदे यांनी समर्थकांना जंतर-मंतरच्या दिशेने पुढे जाणे सुरू ठेवण्याचे आवाहन करताना म्हटले की, जिथे कुठे त्यांना थांबवले जाईल, त्यांनी तिथेच निषेध आंदोलन सुरू करावे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "सरकार आमच्या एकजुटीला घाबरली आहे. तुम्ही सर्वजण कृपया जंतर-मंतरवर पोहोचा आणि जर पोलीस तुम्हाला रस्त्यात थांबवत असतील, तर त्याच ठिकाणाला जंतर-मंतर बनवून टाका.

    अजिंक्य शिंदे कोण आहेत?

    35 वर्षीय अजिंक्य शिंदे हे महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहेत. आम आदमी पार्टीमध्ये (AAP) पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून सहभागी होण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीसोबत काम केले होते. बातम्यांनुसार, अजिंक्य शिंदे यांचे आई-वडील अलिबागमध्ये शेतकरी होते आणि नंतर लातूरमध्ये स्थायिक झाले होते.

    अजिंक्य हे अनेक वर्षांपासून अभिजीत दिपके यांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. माहितीनुसार, ते दिपके यांना पहिल्यांदा 2016 मध्ये गोव्यात भेटले होते आणि तेव्हापासून एकत्र काम करत आहेत. यानंतर ते AAP च्या महाराष्ट्र टीममध्ये सामील झाले, जिथे त्यांनी सोशल मीडिया समन्वयक (कोऑर्डिनेटर) आणि महाराष्ट्र युथ विंगचे संयोजक म्हणून काम केले.

    6 ऑगस्ट 2026 मध्ये दिपके यांनी शिंदे यांना सीजेपीच्या टीममध्ये आणले आणि त्यांच्याकडे संघटना प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. तथापि, यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यानही शिंदे यांनी पडद्यामागून (बॅक स्टेज) आंदोलनाची सूत्रे सांभाळली होती.