पीटीआय, नवी दिल्ली. PTI New Chairman: हिंदी दैनिक वृत्तपत्र 'दैनिक जागरण'चे गैर-कार्यकारी अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुप्त यांची शुक्रवारी वृत्तसंस्था 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'च्या (PTI) संचालक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांची निवड पीटीआयच्या संचालक मंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर झाली.

पीटीआय ही देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था आहे. डॉ. गुप्त हे 'द प्रिंटर्स (म्हैसूर) प्रायव्हेट लिमिटेड'चे के.एन. शान्थ कुमार यांची जागा घेतील. बोर्डाने 'मातृभूमी' समूहाचे एम.व्ही. श्रेयम्स कुमार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. डॉ. गुप्त आणि के.एन. शान्थ कुमार यांच्या व्यतिरिक्त, बोर्डाच्या इतर 13 सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.

मुद्रण माध्यम उद्योगात 60 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले, 84 वर्षीय डॉ. गुप्त यांनी 'युनायटेड न्यूज ऑफ इंडिया' (UNI) चे अध्यक्ष, 'द इंडियन न्यूजपेपर सोसायटी' (INS) चे अध्यक्ष, 'भारतीय भाषा वृत्तपत्र संघटने'चे (ILNA) अध्यक्ष यासह विविध प्रमुख पदांवर काम केले आहे. ते एप्रिल 2006 ते एप्रिल 2012 पर्यंत राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत आणि सध्या आयएनएसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.