नवी दिल्ली: Chhatrapati Shivaji Maharaj Museum Delhi: दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. या डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर उभा राहणार आहे, अशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त) यांनी दिली.

या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितलं. दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह येथील महाराजांच्या संग्रहालयाच्या या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे, असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे वर्ष 2020 पासून यावर काम सुरू आहे. अशी माहिती काक्तीकर यांनी दिली. 

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवावी, यासाठी 13 डी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती काक्तीकर यांनी यावेळी दिली.

किती जागेत आहे संग्रहालय?

इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेले हे संग्रहालय 27000 चौरस फूट क्षेत्रात बांधलेले आहे, असं कर्नल मोहन काक्तीकर यांनी सांगितलं.

किती असेल तिकिट?

    दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयाचे तिकीट दर अद्याप निश्चित केलेले नाहीत. तरीही या संग्रलाहयाचे चार भागात दर असतील, अशी माहिती कर्नल मोहन काक्तीकर यांनी दिली. यामध्ये शासकीय शाळांसाठी सर्वात कमी तिकीट दर असेल, तो जास्तीत जास्त प्रत्येकी 100 ते 150 च्या मध्ये असेल. तर खाजगी शाळांसाठी हा दर 150 ते 200 रुपये राहील, तर सर्वसामान्य भारतीय पर्यटकासाठी याचा दर हा 400 ते 500 रुपये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच, विदेशी पर्यटकांसाठी हा दर सर्वात अधिक असेल, असं कर्नल मोहन काक्तीकर यांनी सांगितलं. 

    संग्रहालयात काय काय आहे?

    • शस्त्रे गॅलरी 

    संग्रहालयात एक शस्त्र गॅलरी आहे, जिथे मूळ कलाकृतींचा अभ्यास करून बनवलेल्या जुन्या शस्त्रांच्या प्रतिकृती आणि जगात उपलब्ध असलेल्या तेरा अस्सल शिवरायांच्या चित्रांच्या प्रती उच्च रिझोल्यूशनमध्ये प्रदर्शित केल्या आहेत, ज्यामध्ये अलिकडच्या काळात नेदरलँडसारख्या परदेशात प्रसिद्ध झालेल्या चित्रांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या समकालीन चित्रांच्या उच्च रिझोल्यूशनमधील अस्सल चित्रांच्या प्रती संग्रहालयात प्रदर्शित केल्या आहेत.

    • शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्र

    संग्रहालयात महाराष्ट्राच्या परंपरांचे चित्रण केले आहे, तसेच शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची महाराष्ट्राची संस्कृती आणि राजकीय/सामाजिक परिस्थिती देखील दर्शविली आहे. 

    • रायगड - शिवाजी महाराजांची राजधानी

    संग्रहालयात रायगड किल्ला आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदर्शित केली आहे. या प्रसंगाच्या वैभवाची कल्पना येते, तसेच या महान किल्ल्याच्या अभेद्य संरक्षणाचीही कल्पना येते. येथे पर्यटकाला रायगडवरील विविध स्थळांची (पाईंटची) अधिक माहिती घेता येते.

    • सुरतची लूट

    संग्रहालयात, शिवाजी महाराजांनी सुरतवर कशाप्रकारे कुच केली, याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. 

    • शाहिस्ते खानाची बोटे छाटली

    छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील 'लाल महाल' वर कशाप्रकारे यशस्वी स्वारी करुन शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याची चित्तथरार असा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात अतिशय तपशीलवार दाखवण्यात आला आहे.

    • शिवाजी महाराजांचे आरमार

    छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. त्यांनी सेराचपासून लढाऊ नौदल उभारले. कल्याण येथे पोर्तुगीज तंत्रज्ञांसह त्यांनी आपले नौदल कसे बांधले ते संग्रहालयात दाखवण्यात आले आहे. खंडारी-उंदरीची लढाई ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि समुद्रातील मराठा सैन्यामधील संघर्ष हा या विभागात ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात दाखवण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या नौदलाने बलाढ्य ब्रिटीश नौदलाचा कसा पराभव केला, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

    • डार्क राईड - शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारसा

    संग्रहालयाचा दुसरा भाग 'डार्क राईड तंत्रज्ञानावर' आधारित आहे, जिथे अभ्यागत स्वयंचलित संगणक नियंत्रित कारमधून प्रवास करता येतो. या कारला नऊ थांबे आहेत. या नऊ थांब्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.   

    छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती

    1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडला भेट दिली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली. 300 वर्षांच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी किती महान आहेत हे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांच्या महान गुणांची आणि कामगिरीची माहिती मिळाल्यावर त्यांनी समाजातील सर्व स्तरांमध्ये, विशेषतः तरुण पिढ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे आणि महान आदर्शांचे जतन, प्रसार आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी ही राष्ट्रीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.