जेएनएन, मुंबई: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
टपाली मतपत्रिकांची पहिलांदा पूर्ण मोजणी
मतपत्रिका / इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील टपाल मतपत्रिका यांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी ह्या आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेतील दोन प्रमुख टप्पे आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होते, तर सकाळी 8.30 वाजल्यापासून ईव्हीएमची मोजणी सुरू होते. पूर्वीच्या निर्देशांनुसार, ईव्हीएमची मोजणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीपासून स्वतंत्रपणे सुरू राहू शकत होती, त्यामुळे काहीवेळा ईव्हीएमची मोजणी टपाल मतपत्रिकांपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत असे.
अलिकडेच दिव्यांग मतदार व 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत सुसंगती आणि स्पष्टता राखण्यासाठी ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या मोजणीतील शेवटून दुसरी फेरी टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देश
याशिवाय, ज्या मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या मोठी आहे, तिथे पुरेशा संख्येने टेबल्स आणि मोजणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत, जेणेकरून मतमोजणीची गती आणि पारदर्शकता कायम राहील, असे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.