जेएनएन, मुंबई. Maharashtra Local Body Election: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिवसेनेच्या खासदारांसोबत आज संसदेच्या कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. 

खुर्चीचा अजेंडा महाविकास आघाडीचा

"आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचा अजेंडा हा जनतेचे कल्याण आणि राज्याचा विकास आहे. खुर्चीचा कोणताही अजेंडा नाही, त्यामुळे मतभेदाचा प्रश्नच उद्भवत नाही. खुर्चीचा अजेंडा महाविकास आघाडीचा आहे. आमची महायुती आघाडी लोकांच्या मुद्द्यांवर काम करते. आमची विचारसरणी एकच आहे." असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

आमची युती एकत्र निवडणुका लढवेल

यावेळी बोलताना त्यांनी "बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याबाबतही चर्चा झाली आहे. आमची युती एकत्र निवडणुका लढवेल" अशी घोषणा केली. 

तसंच, भारताच्या इतिहासात सलग 2,258  दिवस सेवा देणारे अमित शाह हे देशाचे पहिले गृहमंत्री ठरले आहात. याबद्दल आपले अभिनंदन केलं असंही शिंदे म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा युतीला 25 वर्ष पूर्ण झाली. याबाबत बैठकीत चर्चा झाली. ‘एनडीए’ची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, असे ते म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीएला भक्कम पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

    माधुरी हत्तीणबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे. यात राज्य सरकार आणि वनतारा पक्षकार होतील. या प्रकरणी जनभावना लक्षात घेत सरकार त्याचा आदर करेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिल्लीत अधिवेशन सुरु असून येथे येऊन खासदारांना भेटलो, असंही ते म्हणाले.