मुंबई.  Maharashtra Monsoon Session 2026: राज्यातील ट्रिपल तलाकच्या घटनांबाबत आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरून जोरदार चर्चा झाली. आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी केंद्र सरकारच्या ट्रिपल तलाकविरोधी कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

चर्चेदरम्यान राज्यात अजूनही काही ठिकाणी फोन, पत्र, चिठ्ठी किंवा अन्य माध्यमांद्वारे महिलांना ट्रिपल तलाक दिल्याच्या घटना समोर येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ट्रिपल तलाकवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केल्यानंतरही अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण पूर्णपणे थांबलेले नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याची राज्य सरकारकडून काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. संबंधित प्रकरणांमध्ये तक्रार प्राप्त होताच पोलिस आणि प्रशासनाकडून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच महिलांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ट्रिपल तलाकच्या नोंद झालेल्या घटना

सभागृहात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, फोन, चिठ्ठी किंवा पत्राद्वारे तलाक दिल्याच्या घटनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

    या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत अशा घटनांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत असली तरी 2026 मध्येही 16 प्रकरणे समोर आल्याने हा प्रश्न अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आमदार देवयानी फरांदे यांनी चर्चेदरम्यान महिलांच्या सन्मान आणि न्यायाच्या दृष्टीने अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी केली. ट्रिपल तलाकविरोधी कायद्याबाबत अधिक प्रभावी जनजागृती करण्याची तसेच पीडित महिलांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता मागणी केली.

    दरम्यान, राज्य सरकारने केंद्राच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने ट्रिपल तलाकच्या घटनांवर नियंत्रण आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा पुनरुच्चार मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केला.

    वर्ष  प्रकरणे
    202442
    202539
    2026 (आतापर्यंत)16