जेएनएन, चंद्रपूर. Chandrapur News: जिल्ह्यात मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी वाघांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या तीन हल्ल्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या एका आठवड्यात वाघांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला होता. त्यातच 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकाच दिवशी तीन ठिकाणी हल्ले झाल्याने वनविभागासमोर मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
चिमूरमध्ये जंगलालगत वाघाचा हल्ला, 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. गदगाव नियतक्षेत्रातील वनकक्ष क्रमांक 380 मध्ये सदाशिव चिरकटा खडसंग (वय 55, रा. गरडापार) हे शेतालगतच्या जंगल परिसरात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे गरडापार आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदेवाहीत 75 वर्षीय शेतकऱ्याला वाघाने ठार केले
दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमणखेडा गावात घडली. पत्रु रामाजी मेश्राम (वय 75) हे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.
यावेळी शेतामध्ये त्यांचा चष्मा, काठी आणि चप्पल आढळून आली. तसेच परिसरात रक्ताचे डागही दिसले. यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवली असता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने शेतातून त्यांना फरफटत नेत ठार केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, सिंदेवाही तालुक्यात अवघ्या एका आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी पळसगाव (जाट) येथील नानाजी नारायण कामडी यांचा, तर 25 ऑक्टोबर रोजी भेंडाळा येथील प्रेमिला महाडोले यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोंभुर्ण्यात गुराख्यावर हल्ला; प्रकृती गंभीर
दरम्यान, तिसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात घडली. येथे राजेश्वर बिजा सिडाम (वय 60) हे नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी वनकक्ष क्रमांक 436 मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सिडाम गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सिडाम यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Maharashtra Politics: विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत जुंपली! दिल्लीतील नेतृत्वाची मध्यस्थी
मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि त्याच्या बफर क्षेत्रालगत अनेक गावे आहेत. या भागातील नागरिकांना शेतीची कामे, जनावरे चारणे तसेच इतर कामांसाठी जंगलालगतच्या परिसरात जावे लागते. त्यामुळे अनेकदा वाघ आणि मानवी वस्त्यांमधील संघर्षाच्या घटना घडतात.
विशेषतः धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांची शेतांमधील वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतीची कामे करतानाही नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
सलग घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने जंगलालगतच्या गावांमध्ये गस्त वाढवणे, कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देणे आवश्यक झाले आहे. नागरिकांनी एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतात जाणे टाळावे, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात येत आहे.
