वाशिम/अकोला/चंद्रपूर/भिवंडी. राज्यात घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवैध वापर आणि साठेबाजीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, अकोला, चंद्रपूर तसेच भिवंडी येथे पुरवठा विभागाने धाड टाकून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मालेगावात हॉटेल्सवर कारवाई-
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी काही हॉटेल्सवर अचानक छापे टाकले. तपासादरम्यान व्यावसायिक स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
भिवंडीत गॅस साठेबाजीचा पर्दाफाश-
भिवंडी येथे अधिकृत गॅस एजन्सीकडून अनधिकृतपणे गॅस सिलेंडर साठवून त्यांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघड झाला. प्रशासनाने छापा टाकत साठवणूक केलेले सिलेंडर जप्त केले. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
अकोल्यात 23 सिलेंडर जप्त-
अकोला येथील नागरी सुविधा सेंटर आणि एका कॅटरिंग व्यावसायिकावर पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई केली. तपासात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले. या कारवाईत तब्बल 23 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधित कॅटरिंग व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपुरात लग्न मंडपात धाड-
चंद्रपूरमध्ये एका लग्न समारंभासाठी उभारलेल्या मंडपात पुरवठा विभागाने धाड टाकली. तपासादरम्यान स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. यावेळी सहा सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधित कॅटरर्स मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वापराविरोधात कारवाई सुरूच-
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आणि साठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना गॅस उपलब्ध होण्यावर परिणाम होत असल्याने पुरवठा विभागाने राज्यभर तपास मोहीम सुरू केली आहे. अशा प्रकारचा अवैध वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
