सोलापूर. Sugarcane Prices Crisis in Solapur: जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष अद्याप कायम आहे. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत ३२५० रुपये प्रतिटन अधिक १०० रुपये, तसेच साखरेच्या दरानुसार पुढे आणखी १०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी साखर कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितल्याने बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ऊस दराचा तिढा कायम असून, शेतकरी संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

ऊस दराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नियोजन भवन येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री दहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि कारखान्यांचे गाळपही सुरळीत सुरू राहावे, यासाठी बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. मात्र, शेतकरी संघटना आणि कारखानदार आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चेतून मार्ग निघण्यास अडचणी आल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन 3500 रुपये ऊस दर देण्याची मागणी लावून धरली होती. दुसरीकडे, साखर कारखानदारांनी आर्थिक परिस्थिती आणि साखरेच्या बाजारभावाचा विचार करता प्रतिटन 3150 रुपयांपर्यंतच दर देणे शक्य असल्याची भूमिका मांडली. दोन्ही बाजूंच्या मागण्यांमध्ये मोठी तफावत असल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहिले.

अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत प्रतिटन 3250 रुपये आणि त्यावर अतिरिक्त 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. याशिवाय साखरेच्या दराचा विचार करून पुढील टप्प्यात आणखी 100 रुपये देण्याची तरतूदही प्रस्तावात सुचविण्यात आली. या प्रस्तावामुळे शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्षावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मात्र, पालकमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यास कारखानदारांनी असमर्थता दर्शवली. प्रस्तावाचा आर्थिक परिणाम आणि कारखान्यांची परिस्थिती तपासण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे अंतिम निर्णय न घेता कारखानदारांनी बैठकीतून माघार घेतली.