सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ईव्हीएम (EVM) मशीन एका ढाब्यावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी वापरात असलेली ईव्हीएम मशीन परवानगीशिवाय स्ट्राँग रूमबाहेर नेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मोहोळ परिसरातील एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन असलेले वाहन आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच निवडणूक प्रशासन आणि पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. चौकशी दरम्यान परवानगी न घेता ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममधून बाहेर नेण्यात आले होते.

या प्रकरणी वाहनचालक दिनेश भांगे याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून ईव्हीएम मशीनची वाहतूक केल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर मानले जात आहे.

दरम्यान, ईव्हीएम मशीन ढाब्यावर कशा आणले गेले, त्या ठिकाणी किती वेळ होते, तसेच यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस आणि निवडणूक प्रशासन करत आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणा की जाणूनबुजून केलेला प्रकार, यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.प्रशासनाकडून संबंधित सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.