जेएनएन, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या (Gokul Dairy) सत्तासंघर्षात आता आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांना तब्बल 80 लाख रुपये मानधन देण्यास सहकार विभागाने मंजुरी दिली आहे. 23 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काँग्रेसचे आमदार आणि गोकुळमधील समविचारी आघाडीचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक ठिकाणी विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतून 80 लाख रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

नेमके प्रकरण काय?

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर महायुती समर्थित पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या गणपूर्तीवरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक संख्याबळाचा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने कायद्यात बदल केला.

6 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 73 अ (2) मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशानुसार, 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर पाच शासननियुक्त संचालक नेमण्याची तरतूद करण्यात आली. यामध्ये एका शासकीय अधिकाऱ्यासह चार अशासकीय तज्ज्ञ संचालकांचा समावेश असून, या चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळमधील सत्तासमीकरण बदलले. त्यामुळे समविचारी आघाडीच्या संचालकांनी या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले. या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला होता.

    80 लाखांच्या मानधनाला शासनाची मंजुरी

    गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांनी 80 लाख रुपयांचे मानधन आकारले. सहकार विभागाने हे देयक मंजूर करण्यासाठी वित्त विभागाची मान्यता घेतली. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करून 80  लाख रुपयांचे मानधन वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली.

    या रकमेतून आयकर कायद्यातील तरतुदीनुसार 10 टक्के म्हणजेच आठ लाख रुपये आयकर कपात करण्यात येणार आहेत. त्यामुळे अ‍ॅड. रोहतगी यांना प्रत्यक्षात 72 लाख रुपये अदा केले जाणार आहेत. ही रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले आहेत. या खर्चासाठी सहकार विभागाच्या व्यावसायिक सेवा या लेखाशीर्षाखालील निधीचा वापर करण्यात येणार आहे.

    सतेज पाटील यांची सरकारवर टीकेची तोफ

    80 लाख रुपयांच्या मानधनाची माहिती समोर आल्यानंतर सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शासन निर्णयाची कागदपत्रे प्रसिद्ध करत महायुती सरकारवर निशाणा साधला. गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सरकारकडून साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.