जेएनएन, पुणे: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराला वेग आला आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंतच प्रचार करण्याची परवानगी असल्याने, अखेरच्या दिवशी मतदारसंघात रॅली, सभा, पदयात्रा आणि कोपरा बैठकींचा धुरळा उडताना दिसत आहे.
प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जात असून, कार्यकर्त्यांना ताकदीनं मैदानात उतरवण्यात आलं आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू असून, घराघरांत जाऊन थेट संवाद साधण्यावर विशेष भर दिला जात आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्न, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह शेतकरी आणि महिला योजनांचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांचाही जोर वाढला असून, एकमेकांवर टीका करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचाराच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून, आचारसंहिता भंग होणार नाही याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
आज प्रचार थांबल्यानंतर पुढील दोन दिवस प्रचारबंदी राहणार असून, त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा: Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा 'कोंडी'! 32 तासांनंतर रस्ता मोकळा, आता कंटेनर बंद पडल्याने पुन्हा वाहनांच्या रांगा
