जेएनएन, सोलापूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत (Ladki Bahin Yojana) मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य अचानक बंद झाल्याने सोलापूरातील अनेक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तीव्र नाराजी व्यक्त केली. योजनेचे पैसे का थांबविण्यात आले, याबाबत स्पष्ट माहिती मिळावी आणि प्रलंबित हप्ते तातडीने जमा करावेत, अशी मागणी महिलांनी केली.

खात्यात पैसे जमा होत नसल्याने महिला अडचणीत

सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिलांची गर्दी पाहायला मिळाली. योजनेच्या माध्यमातून दरमहा मिळणारी आर्थिक मदत ही त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार असल्याचे महिलांनी सांगितले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खात्यात पैसे जमा होत नसल्याने अनेक महिला अडचणीत सापडल्या आहेत. 

महिलांनी व्यक्त केल्या भावना 

यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. रोजच्या खर्चासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा मोठा आधार होता. आता तोच आधार बंद झाल्याने संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.”

महिलांनी सांगितले की, शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आवश्यक कागदपत्रे देखील वेळेत जमा केली आहेत. तरीही खात्यात पैसे जमा होत नसल्याने त्यांनी बँकांमध्ये चौकशी केली. मात्र बँक अधिकाऱ्यांकडून “शासनाकडून रक्कम जमा झालेली नाही” असे उत्तर मिळत असल्याचा दावा महिलांनी केला.

    “बँकेत गेल्यावर पैसे आलेले नाहीत असे सांगितले जाते, तर नेमकी अडचण कुठे आहे याची माहिती कोणीच देत नाही. त्यामुळे आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करण्यासाठी आलो आहोत,” अशी प्रतिक्रिया काही लाभार्थी महिलांनी दिली. 

    महिलांनी प्रशासनाकडे योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न होण्यामागील कारण स्पष्ट करण्याची तसेच पात्र लाभार्थ्यांचे थांबलेले हप्ते तातडीने वितरित करण्याची मागणी केली. अनेक महिलांनी योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवून लाभार्थ्यांना योग्य माहिती देण्याची गरज व्यक्त केली. 

    दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विभागामार्फत प्रकरणाची माहिती घेऊन महिलांच्या तक्रारींची पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. योजनेचे पैसे बंद होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महिलांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. 

    “मागून खायचं आयुष्य आहे, त्यात लाडकी बहीण योजनेचा आधार होता; आता तोही आधार गेलाय,” अशा शब्दांत अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडत शासनाकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.