पुणे/मुंबई. MPSC Protest: पुण्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थींच्या आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून, सरकारकडून अपेक्षित निर्णय होत नसल्याने आता आंदोलनाची दिशा मुंबईकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यापैकी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या प्रमुख ठरली आहे. या मागणीवर सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास मुंबईत मंत्रालय किंवा MPSC कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही सरकारने निर्णय न घेतल्यास विद्यार्थी पुणे बंद किंवा मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा दिला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC अध्यक्ष आणि आयोगाच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली आहे. या समितीमार्फत सध्याचे आणि माजी अध्यक्ष तसेच आयोगाच्या सदस्यांच्या कामकाजाची चौकशी केली जाणार आहे.
मात्र, चौकशी समितीच्या निर्णयाऐवजी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनावर पोलिसांचीही नजर
पुण्यातील आंदोलनाला अधिकृत परवानगी नसल्याचे सांगत पुणे पोलिसांनी आंदोलक, कोचिंग क्लासेस आणि काही टेलिग्राम चॅनेल्सना 70 हून अधिक नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आंदोलनात राजकीय नेत्यांचा सहभाग वाढल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे सांगत विरोधकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता सरकार भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
