जेएनएन, पुणे. Maharashtra Farmer Loan Waiver: राज्य सरकारने 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत आता हुकणार असून पात्र शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांनी विधानसभेत दिली होती. त्यामुळे आजपासून म्हणजेच 5 तारखेपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. यातच आता कृषीमंत्र्यांनी नवीन अपडेट दिली आहे.

‘काही दिवसांचा विलंब झाला तरी चालेल, परंतु…’

पुण्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती देताना सांगितले की, कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी सुरुवातीला 30 जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु नंतर ती 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आली. सध्या राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पुरवणी अर्थसंकल्पातील मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्यपालांची स्वाक्षरी प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. यात काही दिवसांचा विलंब झाला तरी चालेल, परंतु कोणतीही चूक होऊ नये म्हणून सखोल पडताळणी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाईल, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्य मंत्रिमंडळाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ₹36,585 कोटींची कर्जमाफी देण्यात आहे. यातून 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा अंदाज आहे. पीककर्जावरील ₹2 लाखांपर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभही देण्यात येणार आहे. 

अॅग्रिस्टॅक आयडी अनिवार्य 

    सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक (Farmer ID) अनिवार्य असेल. पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नसल्याचेही आश्वासन दिले आहे.   

    कोणत्या शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ व प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

    • ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. 
    • ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्‍यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल. त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे.
    • तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अधिकाधिक पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 

    कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी 

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेत काही शेतकरी पात्र नसणार आहेत. ते पुढील प्रमाणे…

    • राजकीय पदाधिकारी 
    • सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती
    • सहकारी संस्थांचे 25 हजार रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी, कर्मचारी 

    हेही वाचा -Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा GR निघाला… वाचा जशास तसा एका क्लिकवर

    सविस्तर शासन निर्णय - इथं क्लिक करा...