जेएनएन, पुणे: पुणे शहरात हिवाळ्याचा जोर वाढत असताना महापालिकेने घातलेल्या शेकोटी बंदीचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने शहरात शेकोटी पेटवण्यास बंदी घातली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी पुण्यातील विविध भागांत उघडपणे शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली
शहरात रात्रीचे तापमान 12 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत असल्याने, विशेषतः झोपडपट्टी भागातील रहिवासी, रस्त्यावर काम करणारे कामगार आणि रात्री उशिरापर्यंत प्रवास करणारे नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे अनेकांना थरथर कापणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. उब मिळवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणून नागरिक शेकोटी पेटवत आहेत.
तपास पथकांना सतर्क राहण्याचे आदेश
या प्रकारामुळे वायूप्रदूषणात वाढ, धूरामुळे त्रास, तसेच आग लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा इशारा महापालिकेने दिला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने देखील रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तपास पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. काही भागांत घालण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईनंतरही अनेक ठिकाणी शेकोटी पेटवण्याचे प्रमाण कायम असल्याचे समोर आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेकोटी पेटवणे टाळावे आणि आवश्यक असल्यास उब मिळवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
दरम्यान, तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. थंडीशी मुकाबला करण्यासाठी महापालिकेला अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागणार आहे. पुण्यात वाढत्या थंडीत शेकोटीबंदी आणि नागरिकांची गरज यामध्ये संतुलन साधणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
