जेएनएन, मुंबई: तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना थेट पत्र लिहून तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपत प्रवेश देण्यात आल्याच्या घटनेबाबत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा भाजपत प्रवेश
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “तुळजापूर शहरातील काही व्यक्तींना अलीकडे भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. यामध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. हे अत्यंत गंभीर असून, संबंधित व्यक्तींना पक्षात प्रवेश देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तीला राजाश्रय देणे आहे.”
त्यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे की,“हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, हे पाहून खेद आणि आश्चर्य वाटले. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना थारा देणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रवृत्तींना थारा देणे म्हणजे समाजातील तरुणाईला चुकीचा संदेश देणे आहे.”
पत्रात फडणवीस यांच्यावर थेट भाष्य
सुळे यांनी पत्रात फडणवीस यांच्यावर थेट भाष्य करत म्हटले आहे की, “आपण राज्याचे प्रमुख आहात, त्यामुळे कदाचित ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसेल. परंतु तुळजापूरमधील या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. ड्रग्ज तस्करीला महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही, असा ठोस संदेश समाजात जाणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
