जेएनएन, मुंबई. Shiv Jayanti 2024: महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगा मध्ये अनेक किल्ल्यांचा इतिहास लपलेला आहे. महाराष्ट्राला किल्ल्यांचा देश म्हणूनही ओळखले जाते. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी जिंकलेले 365 किल्ले आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या अनेक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण बाबींची साक्ष हे किल्ले देतात. महाराष्ट्रातील अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या कामगिरीमुळे ओळखले जातात. अशाच काही महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांची माहिती आपण आजच्या लेखातून घेणार आहोत.
राजगड:
किल्ल्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा राजगड किल्ला महाराष्ट्रात सर्वांना परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक घटनांचा साक्षीदार हा राजगड आहे. हा किल्ला इसवी सन पहिल्या शतकातला आहे. पुत्र सातकरणीयाने एका डोंगराला किल्ल्याचे स्वरूप देऊन त्या किल्ल्याचे नाव मुरुंबदेव असे ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. याच किल्ल्यावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. स्वराज्याची राजधानी या किल्ल्यावर होती. त्यानंतर स्वराज्याचा कारभार वाढला व या किल्ल्यावर जागा अपुरी पडू लागल्याने शिवाजी महाराजांनी येथून राजधानी रायगडावर हलवली. हा किल्ला पुण्यापासून 60 किमी अंतरावर आहे.
रायगड:
इ.स 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी घोषित केले. रायगड किल्ल्याचे आधीचे नाव रायरी असे होते. रायगड या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले होते. हा किल्ला साडेतीनशे वर्षा आधी बांधला गेला होता. या किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत असून परकीय आक्रमणांपासून किल्ला सुरक्षित आहे. आपल्या जवळच पाचड येथे जिजाऊ यांची समाधी आहे. रायगडावरची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 1674 मध्ये याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी साम्राज्याच्या राजा म्हणून राज्याभिषेक झाला होता. या किल्ल्यावरील टकमक टोक, हिरकणी बुरुज, गंगासागर तलाव इत्यादी ठिकाण प्रसिद्ध आहेत. या किल्ल्याला भेटी देण्यासाठी आजही बरेच दुर्गप्रेमी येत असतात. रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.

शिवनेरी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावात आहे. इ.स 1595 मध्ये मालोजीराजे भोसले यांनी बहादुर निजाम शहा यांच्याकडून हा किल्ला जिंकला. त्या किल्ल्यावर शिवाई देवीचे देऊळ आहे. या देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नामकरण करण्यात आले होते.अलीकडेच महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये सिंहारूढ असलेल्या ‘मातोश्री जिजाबाई’ व तलवार घेऊन बसलेले बाल शिवाजी यांची पंचधातूची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे.
जंजिरा:
जंजिरा किल्ल्याचा इतिहास 15 व्या शतकातील आहे. संपूर्ण किल्ला समुद्रात खाऱ्या पाण्याने वेढलेला असून या किल्ल्यावर एक गोड्या पाण्याचा तलाव आहे. जंजिरा किल्ला सतराव्या शतकाच्या अखेरीस बांधला आहे. 'जझिरा' या अरबी शब्दावरून जंजिरा किल्ल्याचे नामकरण करण्यात आले आहे. जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. या किल्ल्याला 26 गोलाकार बुरुज आहेत ज्यावर देशी तोफा आहेत. तील कलालबांगडी, सावरी आणि लांडा कसम या तीन मुख्य तोफा आहेत. कोंडाजी फर्जंद यांनी सिद्दीशी मैत्री करून किल्ला ताब्यात घेण्याची योजना बनवली होती. तोफखाना आणि दारूगोळा साठ्यावर हल्ला करून किल्ला मिळवण्याची त्यांची योजना होती परंतु, ही योजना असल्यामुळे या किल्ल्याला मिळवणे शक्य झाले नाही. किल्ल्यावर कोंडाजी फर्जंद ला बंदी बनवून ठार मारण्यात आले होते.
तोरणा किल्ला:
तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड असे आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकला होता. तोरणा किल्ल्यावर जिंकलेल्या खजिनाचा वापर शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला होता. या किल्ल्याचे बांधकाम इ.स 1400 मधील असून, किल्ल्यावर अनेक लेणी आणि मंदिरे आहेत यावरून हा किल्ला शैवपंथाचा आश्रम असल्याचे बोलले जाते. आग्र्याहून परतल्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम केले होते. नंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मोघलांच्या ताब्यात गेला. पुणे परिसरातील सर्वात उंच शिखरावर हा किल्ला असून प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
