जेएनएन, सातारा: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी फलटण येथील आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात राहुल गांधी यांनी संपदा मुंडे यांच्या मृत्यूची (Sampada Munde suicide case) सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास दिला.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण काय आहे?
डॉ. संपदा मुंडे या फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. संपदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी कार्यस्थळावरील ताणतणाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छळ आणि दुर्लक्ष हे कारण असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून डॉक्टर संघटनांनी देखील न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
राहुल गांधींचा संवाद
राहुल गांधी यांनी फोनवर कुटुंबीयांना धीर देत सांगितले की, “संपदासारख्या तरुण, कर्तबगार डॉक्टरला आपण गमावले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. न्यायासाठीची तुमची लढाई ही आता फक्त तुमची नाही, संपूर्ण देशाची लढाई आहे. काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.”
या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून व्हावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
