पुणे. Pune Rain Alert: पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर गेल्या तब्बल 72 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमाशंकरचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

भीमाशंकरकडे जाणाऱ्या दोन्ही प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची ये-जा बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, भीमाशंकरला जाणारे भाविक आणि पर्यटक अडकून पडले असून अनेकांना प्रवास अर्ध्यावरच थांबवावा लागला.

खेड तालुक्यातील राजगुरुनगर–भीमाशंकर मार्गावरील गुंडाळवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक वाहने मार्गातच अडकली असून पुढील प्रवास अशक्य झाला आहे. दुसरीकडे, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरकडे जाणारा मार्गही सकाळपासून घोडेगाव येथे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणारे दोन्ही प्रमुख रस्ते बंद झाल्याने परिसराचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे.

घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका -

सततच्या पावसामुळे घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून आवश्यकतेनुसार बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, भीमाशंकर परिसरात जाण्याचा नियोजन पर्यटकांना आणि भाविकांना सध्या प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान सुधारल्यानंतर आणि रस्ते सुरक्षित झाल्यानंतरच प्रवास करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

    मुसळधार पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही बसला आहे. अनेक गावांमध्ये शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून ओढे-नाल्यांना पूर आला आहे. काही अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    हवामान विभागाने पुढील काही तासांतही घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.