एजन्सी, पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याचा आरोप आहे, ज्यामागे सुमारे 2.5 लाख रुपयांचे कर्ज हे कारण असल्याचा संशय आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
प्रथमेश देशमुख असे मृताचे नाव असून तो परंडा येथील रहिवासी होता आणि एमपीएससी परीक्षांची तयारी करताना नवी पेठ येथे भाड्याच्या घरात राहत होता, अशी माहिती पोलीस उपआयुक्त ऋषिकेश रवळे यांनी पीटीआयला दिली.
सकाळी तो त्याच्या घरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, त्यानंतर काही रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली, असे ते म्हणाले.
देशमुखने दोन पानांची चिठ्ठी (सुसाईड नोट) मागे सोडली आहे ज्यामध्ये त्याने ज्या 18-19 लोकांकडून पैसे घेतले होते त्यांचा तपशील आणि त्याने परत केलेल्या रकमांचा उल्लेख आहे, असे रवळे यांनी सांगितले.
त्याने हे पैसे का घेतले होते याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आत्महत्येची अचूक वेळ समजू शकेल, असे डीसीपींनी सांगितले.
विशेष म्हणजे, मुंबई गुन्हे शाखा मार्चमध्ये पार पडलेल्या एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर (गट-ब) चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाचा तपास करत आहे. एमपीएससी इच्छुकांनी नुकतेच पुण्यासह राज्याच्या विविध भागांत भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि विविध परीक्षांमधील कथित पेपर फूट आणि अनियमिततांवर कारवाईची मागणी करत आंदोलने केली होती.
एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे, असे एका अधिकाऱ्याने पूर्वी सांगितले होते.
‘तरुणांच्या भविष्याशी खेळ’ – हर्षवर्धन सपकाळ
एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 7 सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला त्यांनी पाठिंबा देत, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि भविष्याची राखरांगोळी होत असल्याचा आरोप केला. परीक्षा पारदर्शक, भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
याआधीही सपकाळ यांनी नीट, टीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला होता. जुलैमध्ये त्यांनी पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली सुरू आहे, असा सवाल करत सरकारला जबाबदार धरले होते.
अभिजीत दिपके यांचाही सरकारवर निशाणा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रथमेश देशमुखच्या मृत्यूवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले. प्रथमेशला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही दिपके यांनी म्हटले.
‘परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती’
दरम्यान, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेवरील वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने भरती परीक्षांची पारदर्शकता, सुरक्षा आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यार्थी, पालक, शिक्षक, कोचिंग संस्था आणि लोकप्रतिनिधींकडून सूचना घेणार आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांशी थेट संवादासाठी 12 सप्टेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक होणार आहे.
दरम्यान, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे की औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडली असून त्यांनी 3 मार्च 2026 रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे स्वतःवरील आरोप तथ्यांच्या आधारे तपासले जावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या ‘शैक्षणिक पंढरी’पुढे मोठे आव्हान
एकीकडे देशभरातून विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी, नीट, जेईई आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. मात्र परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, भरतीतील विलंब आणि त्यातून निर्माण होणारा आर्थिक भार यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
