पुणे.Pune News : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. मतदार यादीत नावांच्या चुकांबाबत, गहाळ नोंदींबाबत किंवा दुबार नावे असल्यास नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत एकूण 12,738 हरकती नोंदवण्यात आले असून दिवसभरात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेने प्रभागनिहाय तयार केलेली प्रारूप मतदार यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. नव्या आकडेवारीनुसार,पुणे शहरात एकूण 35,51,469 इतके मतदार नोंदलेले आहेत. यापैकी तब्बल 3,00,446 नावे दुबार असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे. या दुबार नोंदी दूर करण्यासाठी आणि मतदार यादी शुद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.
नागरिकांकडून सर्वाधिक हरकती नाव गहाळ असणे, पत्ता चुकीचा असणे, मृत मतदारांची नावे अद्याप यादीत असणे आणि एका मतदाराचे नाव दोन ठिकाणी नोंदलेले असणे अशा मुद्द्यांवर नोंदवले गेले आहेत. निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात हरकती सादर केले आहे.
हरकतींची छाननी पूर्ण झाल्यानंतर सुधारित मतदार यादी ठराविक तारखेला जाहीर केली जाणार आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता मतदार यादीची अचूकता निश्चित करणे महत्त्वाचे असल्याने प्रशासनाच्या या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
