जेएनएन, बुलढाणा Local Body Election : बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आता थेट सत्ताधारी गटातील आमदाराच्या कुटुंबीयांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान काही मतदारांना बोगस पत्त्यावरून मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवली गेली होती. या तक्रारीची तपासणी करण्यात आली असता नावांची पडताळणी, मतदारांची ओळख व नोंदी यांमध्ये गंभीर तफावत आढळून आली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिन्ही घटनांमध्ये स्वतंत्रपणे गुन्हे नोंदवले आहे.

आमदाराचा नातेवाईक व पुत्र बोगस मतदार -

या कारवाईत आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्याही नावांचा समावेश असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणावर सरकारवर जोरदार टीका केली असून निवडणूक प्रक्रियेची पवित्रता खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील चौकशी वेगाने सुरू असून यात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान बोगस मतदार प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.