पुणे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या तब्बल 100 नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुणे विभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला 100 नगरसेवक गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे.

या गैरहजेरीची पक्षाने गंभीर दखल घेत संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुम्ही कार्यक्रमाला गैरहजर का राहिलात आणि तुमच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. संबंधित नगरसेवकांना नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांकडून आता काय खुलासा केला जातो, याकडे लक्ष लागले आहे. नगरसेवकांनी दिलेल्या उत्तरानंतर पक्षाकडून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, भाजपच्या 100 नगरसेवकांना एकाच वेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने पुण्यात पक्षांतर्गत शिस्त आणि संघटनात्मक कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावणाऱ्या नगरसेवकांना पक्षाकडून कोणता संदेश दिला जाणार, तसेच त्यांच्या स्पष्टीकरणानंतर काय निर्णय घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.