जेएनएन, पुणे. Pune Health News: पुण्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील आर्द्रता वाढली असून साचलेले पाणी, दूषित वातावरण आणि स्वच्छतेचा अभावमुळे विविध संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहेत. परिणामी, दवाखाने व रुग्णालयांत रुग्णसंख्या तब्बल 30 टक्क्यांनी वाढली आहे.
कोणते आजार वाढले?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार खालील आजार सर्वाधिक वाढले आहेत. यामध्ये ताप, सर्दी आणि खोकला, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, उलट्या-जुलाब, पोटाचे संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन), त्वचारोग आणि अॅलर्जीचे प्रकार, टायफॉईडचे रुग्ण विशेषतः मुलांमध्ये वाढले आहे. डॉक्टरांच्या मते, आर्द्र हवामान आणि साचलेल्या पाण्यातून डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. सार्वजनिक ठिकाणे, सोसायट्या, बांधकामे आणि बंद गटारे यांमधील पाणी डेंग्यू-मलेरियासाठी धोकादायक ठरत आहे.
लहान मुलांमध्ये आजारांत वाढ?
पावसामुळे शाळेकरी मुलांमध्ये आजाराचा त्रास जास्त वाढताना दिसून येत आहेत. यामध्ये टायफॉईड, पोटदुखी, अतिसार व उलट्या, त्वचेवर पुटकुळ्या व बुरशीजन्य इंफेक्शन, सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. बाळरुग्ण विभागातही गर्दी वाढली असून अनेकांना भरती करावे लागत आहे.
दवाखानामध्ये वाढली गर्दी
शहरातील खासगी क्लिनिक, सरकारी दवाखाने व मोठ्या रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. यामध्ये तपासणीसाठी लांबच लांब रांगा आहेत. तर औषधांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आपत्कालीन विभागांवर ताण वाढला आहे. बालरोगतज्ज्ञ आणि फिजिशियन यांच्याकडे रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे.