पुणे.  पुणे जिल्ह्यात शार्पशूटर्सच्या पथकाने एका "नरभक्षक" बिबट्याला ठार मारले आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना धास्तीला ठेवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार मारण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेचा शेवट उशिरा रात्री झाला. या मोहिमेत सहभागी झालेल्या वन अधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गेल्या एका महिन्यात जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा रोष निर्माण झाला, जिथे बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती.

रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त स्थानिकांनी वन विभागाचे वाहन पेटवून दिले. सोमवारी वन अधिकाऱ्यांनी या प्राण्याला पकडण्याचे आणि "नाश करण्याचे" आदेश दिले.

मंगळवारी रात्री हल्ल्याच्या ठिकाणापासून 400 ते 500 मीटर अंतरावर नरभक्षक बिबट्या दिसला. शार्पशूटर्सच्या टीमने शांत करणारा डार्ट सोडला, पण तो अयशस्वी झाला. बिबट्या आक्रमक झाला आणि वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे येत असताना, रात्री 10.30 च्या सुमारास केलेल्या गोळीबारात बिबट्याचा मृत्यू झाला. जुन्नर वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बिबट्या 5 ते 6 वयोगटातील होता.

पिंपरखेड येथील ग्रामस्थांना मृतदेह दाखवण्यात आला आणि नंतर शवविच्छेदनासाठी माणिकडोह बचाव केंद्रात हलवण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी, या नरभक्षी बिबट्याला पकडण्यात आले होते.

ड्रोनच्या मदतीने सापडला बिबट्या-

    वन विभागाने गेल्या काही दिवसांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. पिंपरखेड गावाच्या आसपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून आणि ड्रोन सर्वेक्षणातून रात्री उशिरा बिबट्याचा ठावठिकाणा मिळाला. लगेचच पथक त्या ठिकाणी दाखल झालं.

    डार्ट मारण्याचा प्रयत्न अपयशी-

    बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी सुरुवातीला ट्रँक्विलायझर डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डार्ट फायर केल्यानंतर बिबट्या आक्रमक झाला आणि पथकावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी वन कर्मचारी काही अंतरावर सरकले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी शार्पशूटरना आदेश देण्यात आले.

    तीन राऊंड फायरमध्ये ठार-

    वन विभागाने तात्काळ प्रतिसाद देत दोन प्रशिक्षित शार्पशूटरच्या मदतीने तीन राऊंड फायर केले. त्यात बिबट्या ठार झाला. या मोहिमेत स्थानिक पोलिस, वन अधिकारी आणि विशेष प्रशिक्षित कर्मचारी सहभागी होते. ठार झालेला हा नरभक्षक बिबट्या सुमारे सहा वर्षांचा नर असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

    स्थानिकांमध्ये सुटकेचा श्वास-

    गेल्या काही महिन्यांपासून पिंपरखेड आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही जनावरांवर आणि दोन लहान मुलांवर झालेल्या हल्ल्यांनंतर ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती दोन्ही होते. या मोहिमेच्या यशस्वी समाप्तीमुळे नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले आहेत.

    बिबट्याचा पोस्टमॉर्टम-

    बिबट्याचा मृतदेह पंचनामा करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या आक्रमकतेचे आणि आरोग्य स्थितीचे कारण स्पष्ट होणार आहे.