जेएनएन, पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC election) मतदार यादी कार्यक्रमात निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारणा केली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करत आता प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या बदलामुळे मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि हरकतींच्या प्रक्रियेत काही प्रमाणात विलंब झाला असला तरी, अचूक आणि निर्विवाद मतदार यादी तयार करण्यासाठी आयोगाने अतिरिक्त वेळ घेतल्याचे सांगितले आहे.
नवीन वेळापत्रक
- 20 नोव्हेंबर 2025: प्रारूप मतदार यादी जाहीर
- 27 नोव्हेंबर 2025: हरकती आणि सूचनांसाठी अंतिम मुदत
- 5 डिसेंबर 2025: हरकतींचा विचार करून सुधारित यादी प्रसिद्ध
- 12 डिसेंबर 2025 : मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर
या सर्व प्रक्रियेनंतरच महापालिका निवडणुकीच्या पुढील टप्प्यांच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या 165 जागांसाठी आरक्षण
महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
