पुणे - पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतुकीच्या गरजाही वाढत आहेत. त्यामुळे आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. पुणे मेट्रो मार्गिका 3 चे लोकार्पण आणि मेट्रो टप्पा 2 मधील चार मार्गिकांचे भूमिपूजन ही पुण्याच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले आहेत, असेउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
पुणे मेट्रो मार्गिका 3 ही राष्ट्रीय मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून साकार झालेली देशातील पहिली मेट्रो मार्गिका आहे. टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 8 हजार 313 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. तसेच थर्ड रेल तंत्रज्ञानावर आधारित ही महाराष्ट्रातील पहिली मेट्रो मार्गिका आहे.
या मार्गिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित मेट्रो मार्गिका ठरणार आहे. सुमारे 100 महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील 50 टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाची आठवण करून देणारी आहेत.
मेट्रो टप्पा 2 अंतर्गत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे परिसर जोडले जाणार आहेत. सुमारे 31 किलोमीटर लांबीच्या आणि 28 स्थानकांचा समावेश असलेल्या या विस्तारित मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार 858 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे 100 किलोमीटरच्या पुढे जाणार आहे.
अजितदादांचे मेट्रो प्रकल्पासाठी मोलाचे योगदान
पुणे मेट्रोच्या प्रत्येक डीपीआरच्या निर्मितीपासून ते प्रकल्पांच्या मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अर्थमंत्री म्हणून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी स्वतः हिंजवडी येथे भेट देऊन मेट्रो स्थानकांची पाहणी केली होती. तसेच आढावा बैठकीत कामे वेगाने आणि दर्जा राखून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पावसाळ्यात हिंजवडी परिसरात पाणी साचू नये, याबाबतही त्यांचा विशेष आग्रह होता.
हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची घोषणा करण्यात आली. रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी या विषयांवर नियमित समन्वय बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांसाठी 426 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
ही कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरतील, यासाठी पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझे स्वतःचे बारकाईने लक्ष राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
