जेएनएन, पुणे: पुण्यात पुन्हा एक वैष्णवी हगवणे सारखी हुंडा बळीची घटना (Pune Dowry Case) घडली आहे. माहेराहून 20 लाख रुपये आणण्याच्या सासरच्या मागणीला कंटाळून पुण्यात आंबेगाव बु. इथं स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) या विवाहितेने आत्महत्या केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबतचे समाज माध्यमांवर एक ट्वीट केलं असून त्यातून त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
‘माहेराहून 20 लाख रुपये आणण्याची सासरच्यांची मागणी’
‘पैशांसाठी वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच माहेराहून 20 लाख रुपये आणण्याच्या सासरच्या मागणीला कंटाळून पुण्यात आंबेगाव बु. इथं स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) या विवाहितेने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना घडली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही होईल पण यामुळं स्नेहाचा गेलेला जीव परत येणार आहे का? हा प्रश्न मनाला सतावतो. वैष्णवी हगवणे प्रकरणातून समाजाने कोणताही धडा घेतलेला दिसत नसल्याचंच यातून दिसून येतं. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात विवाहितेला जीव गमवावा लागत असेल तर या घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
पैशांसाठी वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच माहेराहून २० लाख रुपये आणण्याच्या सासरच्या मागणीला कंटाळून पुण्यात आंबेगाव बु. इथं स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना घडली. याप्रकरणी सासरच्या… pic.twitter.com/dhGI08ZPIR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2025
‘रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू’
स्नेहा विशाल झेंडगे हिने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत एक फिर्याद दाखल केली आहे. यात ‘रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू’ अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं. सासरच्या ने मानसिक शारीरिक छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप स्नेहाच्या नातेवाईकांचा केला आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय 55, जि. सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
सात जणांवर गुन्हा दाखल
फिर्यादीवरून याप्रकरणात पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.