पुणे. Pune Nilesh Ghaywal: पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासह सर्व आरोपींची खंडणीच्या एका प्रकरणात मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. घायवळ कारागृहात असताना त्याच्या सांगण्यावरून खंडणी मागितल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. मात्र, न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
2020 मध्ये घायवळ कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे त्याच्या भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप होता. या प्रकरणात घायवळ टोळीशी संबंधित काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे’, असे सांगून चॉपरचा धाक दाखवत जीप जबरदस्तीने नेल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली होती.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
या प्रकरणाच्या तपासादरम्यान निलेश घायवळ याचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला होता. घायवळ त्या काळात कारागृहात असल्याने त्याच्याकडून कथितरित्या टोळीतील सदस्यांना सूचना देण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा होता. त्यानुसार या प्रकरणात मोक्का कायद्याच्या तरतुदीही लावण्यात आल्या.
मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाला आरोपींविरोधातील आरोप ठोस पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे मोक्का न्यायालयाने निलेश घायवळसह या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
घायवळ टोळीविरोधात यापूर्वीही कारवाई
निलेश घायवळ हा पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील प्रमुख नावांपैकी एक म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर राहिला आहे. त्याच्या टोळीतील सदस्यांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी तसेच शस्त्र कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.
घायवळ टोळी आणि गजा मारणे टोळी यांच्यातील संघर्षामुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात अनेक वर्षे टोळीवॉरची चर्चा राहिली. घायवळशी संबंधित काही जुन्या प्रकरणांमध्येही न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. एका जुन्या खूनप्रकरणात अभियोजन पक्षाचे पुरावे कमकुवत ठरल्याने आरोपींची मुक्तता झाल्याचे माहिती आहे.
परदेशात फरार असल्याची चर्चा
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर निलेश घायवळ परदेशात गेल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून तो परदेशात गेल्याचा आरोपही करण्यात आला होता.
