जेएनएन, पुणे: पुण्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता कायदेशीर कारवाईचे वळण मिळाले आहे. या आंदोलनाशी संबंधित 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनात उपोषण करणाऱ्या सात विद्यार्थ्यांपैकी ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके यांनी प्रकृती खालावल्यामुळे उपोषण सोडले.

सरकारविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, अशा आरोपांशी संबंधित कलमांन्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. 

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध प्रश्नांवरून हे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी झाले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. 

आंदोलनाची सद्यस्थिती काय? 

  • तीन विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके यांनी प्रकृती खालावल्याने उपोषण सोडले.
  • इतर उपोषणकर्त्यांची भूमिका: उर्वरित चौघांचे उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका असल्याचे वृत्त आहे.
  • पोलिसांची भूमिका: एस. एम. जोशी पुलाजवळील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असून, जागा तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - ‘लवकरच गुडन्यूज येईल, MPSC च्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा’; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची राज ठाकरेंची माहिती