जेएनएन, पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पिंपरीमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी, “राष्ट्रवादीचं घड्याळ आणि तुतारी आता एकत्र आली आहे” असं स्पष्ट केलं.
या घोषणेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी तुटल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रचार सभेतून थेट घोषणा
पिंपरी परिसरात झालेल्या प्रचार सभेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की, पिंपरी-चिंचवडमध्ये विकासासाठी एकसंघ ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या विकासाला अडथळे आले. आता ते थांबवायचे असतील तर सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे,
जागावाटप आणि उमेदवारीवर लवकरच चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्या तरी, जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. स्थानिक पातळीवर समन्वय समिती स्थापन करून प्रत्येक प्रभागातील गणित तपासलं जाणार असल्याचं संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी एकत्र आल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकटे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस आणि ठाकरे गट कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तासमीकरण बदलणार?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत पालिकांपैकी एक मानली जाते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला थेट आव्हान उभं राहणार असून, निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.
हेही वाचा: मुंबईत राष्ट्रवादीची उमेदवार यादी वादात; कुख्यात गुन्हेगार सज्जू मलिकला उमेदवारी, विरोधकांचा तीव्र आक्षेप
