जेएनएन, पुणे: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार 21 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश 21 जुलै रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून लागू होऊन 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. हा आदेश संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असणार आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

या कालावधीत कोणत्याही ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी विनापरवानगी एकत्र येऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा, शासकीय कामकाज तसेच कायद्यानुसार सूट असलेल्या बाबींना या आदेशातून आवश्यक ती सवलत लागू राहणार. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Kumar Saptarshi: ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन