जेएनएन, पुणे. केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्रातही पैसे वाटले. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते पैसे वाटत आहेत. यावर निवडणूक आयोगाने विचार करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

त्याचा हा परिणाम असावा

शरद पवार बोलताना म्हणाले की, मला अधिकृत माहिती नाही. दोन-तीन गोष्टी आहेत. या निवडणुकीच मतदान झालं. त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्यांच्याकडून मला फिडबॅक असा मिळाला. या निवडणुकीच मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. आणि मला एक अशी शंका होती. ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही 10 हजार रुपयाची योजना आहे. सगळ्या महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये भरले. त्याचा हा परिणाम असावा असेही पवार यांनी सांगितले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं योग्य आहे का?

महाराष्ट्रात लाडकी बहीण झाली. तसंच बिहारमध्ये झालं आहे. इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या मनात धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार करावा. निवडणुका स्वच्छ पारदर्शक व्हाव्यात. पण 10-10 हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही अशी टीका ही पवार यांनी केली.