जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काल पक्षाच्या पुणे येथे पार पडलेल्या वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षात अनेक नेते इच्छुक आहेत.
असे आहेत प्रदेशाध्यक्ष पदाचे दावेदार!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राज्याचा शिलेदार कोण असणार यावर जोरदार चर्चा पक्षात सुरू आहे. प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार यावर शरद पवारांकडून चाचपणी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षात अनेक नेते इच्छुक आहेत. यामध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर नवीन चेहऱ्यांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
पुणे येथे पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे द्यावी, अशी विनंती पाटील यांनी शरद पवार यांना केली आहे. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 7 वर्षे संधी मिळाली आहे असे भाष्यही पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार जोरदार प्रयत्नशील आहेत.