पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी आणि निवडक आमदार जिजाई बंगल्यावर एकत्र आले होते. या बैठकीला पक्षातील ठराविक आमदारांनाच निमंत्रित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

विशेष म्हणजे, ही बैठक अचानक आणि तातडीने बोलावण्यात आल्याने तिच्यामागील नेमका उद्देश काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असताना या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

बैठकीनंतर बाहेर पडलेल्या आमदारांनी या चर्चांबाबत स्पष्टीकरण दिले. आमदार शरद मांडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दिवाळीनिमित्त यंदा अजित पवार यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे सुनेत्रा पवार पुण्यात आल्याचे समजल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी आपण आलो होतो. याशिवाय, विकासकामे आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मुळशीचा समावेश नसल्याचा मुद्दाही त्यांच्यासमोर मांडायचा होता.

विलीनीकरणाच्या चर्चेवर कोणतीही चर्चा नाही!

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आमदार शरद मांडेकर यांनी विलीनीकरणाबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही केवळ तीन आमदार होतो. तीन आमदार विलीनीकरणाबाबत काय चर्चा करणार? पार्थ पवार यांनीही याबाबत काही भाष्य केले नाही, असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणासंदर्भातील निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर घेतला जाईल. पक्षाचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

    दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, बैठकीनंतर आमदारांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या बैठकीचा उद्देश विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.