मुंबई. NCP Merger Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार का, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असून विलिनीकरणाची प्रक्रिया, त्यातील अटी-शर्ती आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या चर्चांना सकारात्मक वळण मिळत असतानाच संजय राऊत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
राऊतांचा नेमका दावा काय?
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील 20 ते 22 आमदार कोणत्याही क्षणी पक्ष सोडू शकतात, असा दावा केला. हे आमदार पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असून शरद पवार यांची भेट घेत आहेत. या भेटी केवळ गप्पा मारण्यासाठी नसल्याचेही राऊत म्हणाले.
अजित पवार यांचे नेतृत्व नसल्यामुळे या आमदारांना पक्षात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आमदारांसमोर शरद पवार यांच्या गटात परतणे किंवा अन्य पक्षात जाणे असे पर्याय असल्याचे राऊत यांनी सूचित केले. मात्र, 20 ते 22 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या दाव्याला त्यांनी कोणताही सार्वजनिक पुरावा दिलेला नाही.
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन-
राऊत यांच्या वक्तव्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पक्षात हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षातील सर्व आमदारांशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती आहे.
या फोनद्वारे आमदारांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
- दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत तुमचे मत काय आहे?
- दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणे योग्य वाटते का?
- शरद पवार यांच्या गटाकडून तुम्हाला कोणी संपर्क साधला आहे का?
- विलिनीकरणाच्या चर्चेबाबत तुमच्याशी काही बोलणे झाले आहे का?
या प्रश्नांच्या माध्यमातून आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केल्यानंतरच ही फोनाफोनी सुरू झाल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
