जेएनएन, पुणे. Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसात हा पूल येथील अपघातामुळे चर्चेत राहिलेला आहे. आता साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने ट्रकला आणि इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भूमकर पुलावर अपघात
कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. एका मालवाहू कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या भरधाव कंटेनरने काही वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर काही जण जखमी झाले आहेत.
ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव कंटेनरने
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका अवजड कंटेनरचे भूमकर पुलाजवळ आल्यावर अचानक नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे या भरधाव कंटेनरने पुढील ट्रकला आणि रस्त्यावरील इतर वाहनांना चिरडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री साडेबारा वाजता हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
दोन ट्रकची ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचावकार्य केले.
