जेएनएन, पुणे. Pune Manache 5 Ganpati: पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच आणि त्याचा पाया हा पुण्यामध्ये घातला गेलेला आहे, त्यामुळेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा आहे. यामध्ये कालांतराने अनेक गणेश उत्सव मंडळे निर्माण होत गेली आणि आज सध्या हजारो मंडळे पुण्यामध्ये कार्यरत आहेत.
पण त्यापैकी काही निवडक, जुने, ऐतिहासिक आणि मानाचे असे पाच गणपती पुण्यात आजही आहेत. आणि याच मानाच्या पाच गणपतींविषयी आपण माहिती घेणार आहेत.
पुण्यातील मानाचे पाच गणपती
1. मानाचा पहिला – कसबा गणपती
2. मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी
3. मानाचा तिसरा – गुरुजी तालीम
4. मानाचा चौथा – तुळशीबाग गणपती
5. मानाचा पाचवा – केसरीवाडा गणपती
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची थोडक्यात माहिती
- मानाचा पहिला – कसबा गणपती (Kasba Ganpati)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे ग्रामदैवत म्हणून पूजले जाणारे कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती आहे. राजमाता जिजाऊ यांनी या स्वयंभू मूर्तीसाठी दगडी गाभाऱ्याची उभारणी केली होती. छत्रपती शिवराय कोणत्याही मोहिमेवर निघण्यापूर्वी या गणरायाचे आशीर्वाद घेत असत. अतिशय साधेपणा, परंपरेचे काटेकोर जतन आणि विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व हे या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी (Tambdi Jogeshwari)
पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणून तांबडी जोगेश्वरी ओळखला जातो. या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि भाद्रपदात नवी मूर्ती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा आहे. पितळी मखरात विराजमान होणाऱ्या या बाप्पाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पालखीतून निघते.
- मानाचा तिसरा – गुरुजी तालीम (Tambdi Jogeshwari)
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेला गुरुजी तालीम बाप्पा हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील बंधुभावाचे जिवंत प्रतीक मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करण्यापूर्वी म्हणजेच 1887 मध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या उत्सवाची पायाभरणी केली होती.
- मानाचा चौथा – तुळशीबाग गणपती (Tulsibaug Ganpati)
पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1900 मध्ये या उत्सवाची सुरुवात झाली. व्यापारी पेठेच्या केंद्रस्थानी असलेला हा गणपती आपल्या भव्य रूपासाठी आणि नेत्रदीपक सजावटीसाठी पुण्यासह राज्यभरात ओळखला जातो. कलात्मक आणि कल्पक देखावे साकारण्यात या मंडळाचा मोठा नावलौकिक आहे.
- मानाचा पाचवा – केसरीवाडा गणपती (Kesariwada Ganpati)
पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये या उत्सवाची सुरुवात केली होती. सुरुवातीला विंचूरकर वाड्यात आणि नंतर केसरीवाड्यात होणाऱ्या या उत्सवातून स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणारी व्याख्याने व विचारमंथन घडले होते. येथील मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील वर्णनावर आधारित आहे. तिचे विसर्जन पारंपरिक पालखीतूनच केले जाते.
