एजन्सी, पुणे. माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत वारक गावाजवळ रस्त्यात एक ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पुण्याकडे आणि माणगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

अरुंद भागात ट्रक बंद पडला

शनिवार असल्याने ताम्हिणी घाटमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली असतानाच ही घटना घडली. रस्त्याच्या अरुंद भागात ट्रक बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा परिणाम काही अंतरापर्यंत जाणवला असून, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

वाहतूक संथगतीने

कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावर वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याने प्रवासाचा वेळ वाढला आहे. ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वेग कमी ठेवावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.