जेएनएन, पुणे. Jejuri Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी, भूलोकी व पाताळलोकी (त्रैलोक्य) या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली आहे.

जेजुरी मल्हारमय 

आज पहाटे पासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले. जेजुरीगडावर येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट, हर हर महादेवाच्या जयघोषाने जेजूरीतील वातावरण मल्हारमय झाले आहे, अशी माहिती जेजुरी देवस्थान विश्वस्त मंगेश घोंहने यांनी दिली आहे. 

महाशिवरात्रीला वेगळं महत्त्व

जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते.  म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्त्व आहे, असं त्यांनी सांगितलं.

    त्रैलोक्य महिमा 

    जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते, अशी महिमा त्यांनी सांगितली.

    वर्षातून एकदाच उघडात हे शिवलिंग

    मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात, असं मंगेश घोंहने यांनी सांगितलं.