पुणे. Maharashtra Weather Update: देशभरात सध्या हवामानाचा पूर्णपणे लहरीपणा पाहायला मिळत आहे. सकाळी प्रचंड उकाडा, दुपारी ढगांची गर्दी आणि संध्याकाळी वादळी पावसाची हजेरी अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकही संभ्रमात पडले आहेत. नेमका उन्हाळा सुरू आहे, की पावसाळ्याची चाहूल लागली आहे हेच कळेनासं झालं आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा हा अनिश्चित खेळ सुरू असून, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा महत्त्वाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा कायम-

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात तापमान 40 अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून, उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टी भागात आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. “गरमीपेक्षा घामाने जीव कासावीस होतोय,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उत्तर भारतात पश्चिमी झंझावात सक्रिय-

दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार देशाच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात पुन्हा पश्चिमी झंझावात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    हिमालयीन भागात हवामान अचानक बदलण्याची शक्यता असून, उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये हिमवर्षावाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत-

    हवामानातील या सततच्या बदलांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळबागा, भाजीपाला आणि काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. आंबा, द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत.

    आरोग्याचाही प्रश्न गंभीर-

    एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे अचानक होणारा पाऊस यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ताप, सर्दी, व्हायरल संसर्ग आणि डिहायड्रेशनच्या तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.