जेएनएन, सोलापूर. Solapur Heavy Rain : सोलापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने (Heavy Rain) सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोलापूरसह किनवट, नांदेड तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या मान्सूनने झोडपून काढले.
सोलापुरात रात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प आणि शिरवळवाडी तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बोरी मध्यम प्रकल्पातून विसर्ग वाढवला -
बोरी मध्यम प्रकल्पातून पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी 6 वाजता वाढवून 4000 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे बोरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीलगत जाणे टाळावे, तसेच पूल ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
शिरवळवाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग-
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी तलावातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे शिरवळ ते वागदरी हा रस्ता पाण्याखाली गेला असून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना रस्ता ओव्हरफ्लो असताना ओलांडणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाची सतर्कता-
जलसंपदा विभाग आणि पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
संबंधित ग्रामपंचायतींनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामस्तरिय पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतींनी नागरिकांना वेळोवेळी योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.